विद्यानिकेतनमध्ये नवरात्री उत्सव उत्साहात साजरा

 


चिमुकल्या विद्यार्थिनींच्या नवदुर्गा वेशभूषेने वेधले सर्वांचे लक्ष


विभागीय संपादक निलेश रामगावकर 



 अमरावती/धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विद्यानिकेतन प्री-प्रायमरी व प्रायमरी सीबीएसई स्कूलमध्ये नवरात्री उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे संचालक  राजेंद्र जोशी, प्राचार्य अमितजी वानखेडे आणि उपप्राचार्या रंजूश्री शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गांची वेशभूषा केलेल्या केजी-२ मधील विद्यार्थिनींचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राचार्य अमितजी वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना नवरात्री सणाचे महत्त्व सांगून भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले. शाळेचे संचालक  राजेंद्र जोशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्या  रंजूश्री शेंडे यांनी नवरात्रीची कथा सांगून चिमुकल्या विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे व आकर्षक वेशभूषेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे चिमुकल्या विद्यार्थिनींनी साकारलेल्या नवदुर्गांच्या नऊ रूपांचे देखणे सादरीकरण. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या या विद्यार्थिनींनी उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये शैलपुत्री – प्रांशी कुडमटकर, ब्रह्मचारिणी – हिंदवी संगीत राव, चंद्रघंटा – प्रियल भलमे, कूष्मांडा – शाश्वती ठोसर, स्कंदमाता – अधिरा गुल्हाने, कात्यायनी – निमिषा सरपे, कालरात्री – आयुषी तलमले, महागौरी – पाखी राठी आणि सिद्धिदात्री – मनस्वी म्हात्रे यांनी नवदुर्गांची वेशभूषा साकारली. त्यांच्या या सादरीकरणामुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यानिकेतन प्री-प्रायमरी विभागाच्या प्रभारी गायत्री शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन सौ.स्नेहल अग्रवाल यांनी  केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील प्री-प्रायमरी व प्रायमरी विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post