मदनापूर शिवारातील रेल्वे रुळांवर आढळला वाघाचा मृतदेह; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल
किनवट | ग्रामीण प्रतिनिधी धीरज साळुंके
किनवट तालुक्यातील मदनापूर शिवारात रेल्वे रुळांवर पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास पॅसेंजर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण वनविभागाच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील पंधरा दिवसांपासून बोधडी खुर्द, भुलजा, मदनापूर, शनिवारपेठ, दरसावंगी आणि दाभाडी परिसरातील शेतशिवारांमध्ये पट्टेदार वाघाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या भागात वाघाच्या हालचालींबाबत चर्चा सुरू असतानाच मदनापूर शिवारातील रेल्वे रुळांवर वाघाचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच खरबी, किनवट आणि बोधडी बुद्रुक परिसरातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत वाघाला शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
वाघाचा मृत्यू रेल्वेच्या धडकेतच झाला का, तसेच परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून वावरत असलेला हाच वाघ होता का, याबाबत वनविभागाच्या तपासानंतरच स्पष्टता येणार आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा आणि रेल्वेमार्गावरील वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
