काँग्रेस कार्यकर्त्यांना पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन
माहूर, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी माहूर तालुक्यात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माहूर तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन किनवट व माहूर तालुक्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरावे, पदवीधर मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधावा आणि प्रचार अधिक प्रभावी करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
माहूर येथे आगमन झाल्यानंतर किनवट व माहूर तालुक्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीची रणनीती, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक तयारी यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसचे युवा नेते डॉ. अब्दुल बाकी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रमेश गावंडे पाटील, माहूर तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माहूर पंचायत समितीचे माजी सभापती किशनदादा राठोड, जिल्हा सरचिटणीस तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मंचकराव देशमुख, माहूर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, किनवटचे काँग्रेस युवा नेते पुंडलिक आमले, अनिल पाटील जाधव, जगदीश पाटील तुपदाळे, माहूर शहराध्यक्ष शेख सादिक, तालुका कार्याध्यक्ष जयकुमार पाटील आडकीने, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मोबिन शेख, सेवादल तालुकाध्यक्ष राजू राठोड, तालुका सरचिटणीस सैय्यद अली सहाब, निसार कुरेशी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बेहेरे, शहर सरचिटणीस शरीफ शेख, राजू सौंदलकर, संदीप सुकळकर, संजय गायकवाड आणि शेख जावेद यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
डॉ. पाटील यांच्या या दौऱ्यामुळे माहूर व किनवट परिसरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. पदवीधर मतदारांशी थेट संपर्क वाढविण्यावर भर दिला जात असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग येत असल्याचे चित्र आहे.
