राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात; राष्ट्रवंदनेने सांगता
विभागीय संपादक निलेश रामगावकर
मारडा, अमरावती : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत कर्मयोगी फाउंडेशनच्या वतीने ग्राम मारडा येथे वृद्ध व्यक्तींना आधार काठी वाटप तसेच समाजातील गुणवंत व्यक्तींच्या सत्काराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
वृद्ध व्यक्तींना दैनंदिन जीवनात आधार मिळावा आणि त्यांच्या जीवनातील अडचणी काही प्रमाणात कमी व्हाव्यात, या उद्देशाने आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला कर्मयोगी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विनोद तितरे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर कडू, तिवसा तालुकाध्यक्ष नागेश लुटे, अमोल असोले, योगेश जीरापुरे, सचिन ढगे, देवानंद घुले, अशोकराव पाटील, धनगरांची जीरापुरे, सुनील आसोडे, संतोष ताजने, संतोष मठीया, नंदू जिरापुरे आणि अवधूत हेंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ग्राम कुऱ्हा येथील सतीश डहाके, पिंटू दारोकार, करण धंदरे, मधुकर तालनर आणि संजय टेकाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रार्थनेने सुरुवात, राष्ट्रवंदनेने सांगता
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ग्राम मारडा येथील बालगोपाल भजनी मंडळाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. तर राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संतांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आधार देणे आणि गुणवंतांच्या कार्याचा सन्मान करणे, हा या उपक्रमाचा सामाजिक संदेश ठरला.

