बँक स्टेटमेंटसह मूळ अभिलेख सादर करण्याचे निर्देश; विकासकामांच्या खर्चाबाबत ग्रामस्थांचे प्रश्न
किनवट | तालुक्यातील बोधडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर पंचायत समिती किनवटने चौकशीची व्याप्ती वाढवली आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील बँक खात्यांचे स्टेटमेंट मागविण्यात आले असून, ग्रामसेवक प्रेमानंद सिरसेवाड यांना मूळ अभिलेख सादर करण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आल्याची माहिती आहे.
ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी प्राप्त झालेला निधी, त्याचा विनियोग आणि विविध कामांवरील खर्च याबाबत बोधडी बुद्रुक येथील तरुणांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर प्रशासनाकडून आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचा इशाराही देण्यात आल्याचे समजते.
खो-खो मैदान, शालेय साहित्य, पाणीपुरवठा योजना आणि इतर विकासकामांवरील खर्चाबाबत ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवले आहेत. तसेच, सन २०२५ मध्ये बिल अदा झालेल्या बाकड्यांपैकी १५ बाकडे ६ ऑक्टोबर २०२६ रोजी गावात आणण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या सर्व बाबींची सत्यता अधिकृत चौकशी आणि उपलब्ध कागदपत्रांच्या पडताळणीतून स्पष्ट होणार आहे.
गावातील विकासकामांमध्ये पारदर्शकता असावी, सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग व्हावा आणि आर्थिक व्यवहारांचा हिशेब ग्रामस्थांसमोर यावा, अशी मागणी तरुणाईकडून होत आहे. आता बँक खात्यांचे स्टेटमेंट आणि मूळ अभिलेखांच्या तपासणीतून कोणती माहिती समोर येते, याकडे बोधडी बुद्रुकसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सार्वजनिक निधीच्या विनियोगाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकृत चौकशीतून मिळणे महत्त्वाचे असून, दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

