अनेक वर्षांची नेटवर्कची समस्या दूर; परिसरात आनंदाचे वातावरण
वानोळा (ता. माहूर) : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वानोळा व परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या मोबाईल नेटवर्कच्या समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे. वानोळा बाजार येथे दि. १ ऑक्टोबर रोजी व्ही.आय. (VI) कंपनीच्या नव्या मोबाईल टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे परिसरात मोबाईल नेटवर्क सेवा सुरू झाली असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वानोळा परिसरात पुरेसे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, युवक, शेतकरी तसेच ग्रामस्थांना ऑनलाइन शिक्षण, शासकीय कामकाज, डिजिटल व्यवहार, बँकिंग सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता व्ही.आय. कंपनीची नेटवर्क सेवा सुरू झाल्याने या समस्येवर काही प्रमाणात तोडगा निघाला असून नागरिकांना मोबाईल संपर्काची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या मोबाईल टॉवरसाठी पाचुंदा येथील सामाजिक कार्यकर्ते अजय पवार पाटील तसेच नांदेड येथील रवी राठोड यांनी पुढाकार घेतला. संबंधित कंपनीकडे मागील वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी वानोळा परिसरात मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.
अजय पवार पाटील यांच्या हस्ते टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. वानोळा परिसरात मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी अजय पवार पाटील व रवी राठोड यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी टॉवरचे कर्मचारी गौरीशंकर राठोड, गिरीश भुतकर, दीपक राठोड यांच्यासह वानोळा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन मोबाईल सेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारात मोठी सुविधा मिळणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.



