SBI व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पीक कर्जातील कथित टाळाटाळीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
किनवट/माहूर : दुष्काळी परिस्थितीत पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या किनवट व माहूर तालुक्यातील १५ हून अधिक गावांतील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पीक कर्जाच्या मागणीसाठी संबंधित बँकांकडून कथित टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पालाईगुडा, ता. माहूर येथील तलावात सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा अग्रणी बँक, SBI क्षेत्रीय कार्यालय, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच माहूर व किनवट तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. निवेदनावर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा आवक शिक्काही प्राप्त झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, SBIच्या माहूर, सारखणी व मांडवी शाखांसह महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माहूर, वाई (बा.) व उमरी (बा.) शाखांकडून गेल्या काही महिन्यांपासून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. CIBIL स्कोअर खराब असणे, सामाईक क्षेत्र, भोगवटा वर्ग-२, बचत गटाचे कर्ज आदी कारणे सांगून कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच खरीप कर्जाऐवजी रब्बी पिकासाठी कर्ज घेण्याची सक्ती केली जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
या समस्येबाबत शेतकऱ्यांनी विधान परिषद सदस्य हेमंत पाटील तसेच किनवट-माहूरचे आमदार भीमराव केराम यांच्याकडे तक्रार केली होती. दोन्ही लोकप्रतिनिधींनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित बँकांना शिफारसपत्रे दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
पीक कर्जाचा प्रश्न तातडीने सोडवून शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास १६ ऑक्टोबर रोजी पालाईगुडा तलावात सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित बँक प्रशासन व प्रशासनिक यंत्रणा जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
गौरी तांडा, सतीगुडा, चिंचखेड, पारडी, रूपानाईक तांडा, उमरी (बा.), सकुनाईक तांडा, लोकरवाडी, बेगमबाई तांडा आदी गावांतील ५२ हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर असल्याचे सांगण्यात आले आहे. निवेदनाची प्रत हेमंत पाटील व आमदार भीमराव केराम यांनाही देण्यात आली आहे.



