१४ ऑक्टोबरला भव्य बौद्ध धम्मदीक्षा समारोह; देशभरातून हजारो भिक्खू व उपासकांची उपस्थिती
किनवट : राष्ट्रीय बौद्ध महासभेचे २०वे राष्ट्रीय अधिवेशन १२ व १३ ऑक्टोबर २०२६ रोजी कलिंग, भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने १४ ऑक्टोबर रोजी विशाल बौद्ध धम्मदीक्षा समारोहाचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातून भिक्खू संघ तसेच हजारो उपासक उपस्थित राहणार आहेत.
कलिंगची भूमी सम्राट अशोक यांच्या जीवनातील ऐतिहासिक परिवर्तनाची साक्षीदार आहे. सुमारे २२०० वर्षांपूर्वी कलिंग येथे झालेल्या भीषण युद्धातील नरसंहारामुळे सम्राट अशोक यांच्या मनात परिवर्तन झाले. त्यानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून मानवतावादी, समतावादी आणि शांततेचा संदेश देश-विदेशात पोहोचविण्यासाठी कार्य केले. त्यांचे पुत्र महेंद्र व कन्या संघमित्रा यांना धम्मप्रचारासाठी श्रीलंकेत पाठविण्यात आले.
या ऐतिहासिक व पवित्र धम्मभूमीवर आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाला संस्थेचे संस्थापक धर्मप्रकाश भारतीय (बौद्ध), माजी आमदार व माजी मंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष बी. एस. बौद्ध, राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजाराम आनंद, डी. पी. बौद्ध, इंजि. शेषराव घांगळे यांच्यासह राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय सचिव, ट्रस्ट परिषद सदस्य, राष्ट्रीय महिला आघाडी, राष्ट्रीय धम्म सेवक संघाचे युवक-युवती व विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
१२ ऑक्टोबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच ३२० पदाधिकारी व समर्पित कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र व गुजरात प्रभारी प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी माहिती दिली.
या ऐतिहासिक राष्ट्रीय अधिवेशनास व धम्मदीक्षा समारोहास महाराष्ट्रातून जास्तीत जास्त अनुयायांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी ईश्वर कडबे, अध्यक्ष डॉ. चांगदेव शेंडे, महिला आघाडीच्या सुनंदा ताई पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


