आदिलाबाद-माहूर बसला आग; चालक-वाहकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
अग्निशमन पथकाच्या तत्पर कार्यवाहीने आगीवर नियंत्रण
माहूर : आदिलाबाद-माहूर मार्गावर धावणाऱ्या आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये सुमारे दहा प्रवासी असल्याची माहिती असून, चालक व वाहकांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्याने मोठी दुर्घटना टळली.
बसला आग लागल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना दूरध्वनीद्वारे दिली. माहिती मिळताच नगराध्यक्षांनी विलंब न करता नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना केले.
अग्निशमन पथकाने घटनास्थळी पोहोचून तातडीने कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले. चालक व वाहकांचे प्रसंगावधान, नागरिकांनी दिलेली तत्काळ माहिती आणि अग्निशमन पथकाची वेळेवर झालेली कार्यवाही यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सतर्कता दाखविणाऱ्या बसचालक व वाहकांसह तत्काळ माहिती देणाऱ्या नागरिकांचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी कौतुक केले.
