उपसंपादक/संतोष भालेराव
चिखलदरा : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांनी सोमवारी चिखलदरा तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांचा आढावा घेतला तसेच नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तालुक्यातील वनपट्टा अतिक्रमणाची प्रकरणे प्रलंबित असल्याने ती तत्काळ निकाली काढण्यासाठी आमदार काळे यांनी चिखलदरा तहसीलदार जीवन मोरणकर यांच्याशी चर्चा केली.
यावेळी वनहक्क पट्ट्यांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, नागरिकांच्या अडचणी तसेच पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकरणांवर प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका आमदार काळे यांनी मांडली.
यानंतर पंचायत समिती, चिखलदरा येथे जी रामजी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत ग्रामीण भागातील विकासकामांची सद्यस्थिती, कामांची प्रगती आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
तालुक्यातील घरकुलांचे रखडलेले हप्ते, मजुरांच्या मस्टरचे प्रलंबित पैसे, दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाई या गंभीर प्रश्नांवरही आमदार काळे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. लाभार्थी व मजुरांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळावेत तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही आमदार काळे यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी चिखलदरा तहसीलदार जीवन मोरणकर, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुकाध्यक्ष आलोक अलोकार, दिनेश चव्हाण, हिरूजी हेकडे, शैलेश म्हाला, यशवंत काळे, स्वप्नील भक्ते, अभिषेक राठोड, सुभाष अमोदे, श्रीराम आठवले, महादेव शनवरे, स्वीय सहाय्यक आकाश खैरकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
