लखमापूर येथे जलतारा कामाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे अधिकाधिक जलसंधारण कामे हाती घेण्याचे निर्देश
श्रीक्षेत्र माहूर: पावसाअभावी माहूर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची दाहकता आता प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरही स्पष्ट झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलतारा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे हाती घेत योजना प्रभावीपणे राबवा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी माहूर तालुक्यातील ग्रामपंचायत लखमापूर येथे भेट देऊन जलतारा कामाचे उद्घाटन केले यावेळी मा जि प उपाध्यक्ष समाधान जाधव गटविकास अधिकारी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तांत्रिक अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी ग्राम रोजगारसेवक सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. अनेक भागांत पाण्याची उपलब्धता घटली असून, शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत जलसंधारणाची कामे ही केवळ विकासकामे न राहता दुष्काळाशी लढण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहेत. त्यामुळे जलतारा अंतर्गत उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून अधिकाधिक कामे पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
‘माहूरचा दुष्काळ प्रत्यक्ष पाहा’; समाधान जाधव यांचा अधिकाऱ्यांसमोर वस्तुस्थितीचा आरसा
यावेळी किनवट/ माहूर विधानसभेचे नेते समाधान जाधव हेही उपस्थित होते. त्यांनी माहूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष वस्तुस्थिती जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, शेतीचे झालेले नुकसान, पाण्याची टंचाई आणि ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
माहूरच्या ग्रामीण भागातील दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबवून भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी ठोस नियोजन करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने थेट गावपातळीवर भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतल्याने माहूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


