सिंदखेड पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

 



पोलिसांच्या वतीने पत्रकार पोलीस पाटील व गणेश मंडळाचा सत्कार 


गावाकडची बातमी विशेष प्रतिनिधी माहुर पंकज जयस्वाल 


माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गणेश मंडळे, पोलीस पाटील आणि पत्रकार बांधवांसाठी विशेष 'स्वागत व सत्कार सोहळा' तसेच आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'शांतता कमिटी बैठकीचे' आयोजन करण्यात आले होते.

गणेशोत्सवाच्या काळात परिसरातील गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत, डीजेमुक्त आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अत्यंत उत्साहात मिरवणुका काढल्या. या उत्कृष्ट उपक्रमाला पत्रकार बांधवांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन मोलाचे सहकार्य केले, तर पोलीस पाटलांनीही शांतता व सुव्यवस्था राखण्यात मोलाचा वाटा उचलला. या उल्लेखनीय सहकार्याबद्दल पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व गणेश मंडळे, पत्रकार बांधव आणि पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे, व राजकुमार पडलवार यांनी सण-उत्सवांच्या काळातील आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "आगामी सण-उत्सव देखील डीजेमुक्त ठेवून पारंपरिक वाद्यांच्या गजरातच साजरे करावेत. सिंदखेड पोलिसांना नागरिकांनी नेहमीप्रमाणे सहकार्य करावे." तसेच वाढत्या ऑनलाईन गुन्हेगारीवर भाष्य करताना त्यांनी, "सायबर फ्रॉडपासून नागरिकांनी अत्यंत सावध राहावे, आपला कोणताही ओटीपी (OTP) अथवा गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये," असे आवाहन केले.

प्रमुख उपस्थिती असलेले तालुका दांडाधिकारी तथा तहसीलदार अभिजित जगताप यांनी आगामी नवरात्रोत्सव सर्वांनी शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे सांगून, "उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी," असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पोलीस कर्मचारी, शांतता कमिटीचे सदस्य, पोलिस पाटील, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post