माहूर : छायाचित्र ईलीयास बावानी माहूरगड
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री रेणुकादेवी संस्थान, माहूर यांचे अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत स्वरूपात आश्विन शुद्ध प्रतिपदा, अर्थात ११ ऑक्टोबर २०२६ पासून भक्तांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवादरम्यान माहूरगडावर येणाऱ्या भाविकांना आवश्यक माहिती व विविध सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे.
या संकेतस्थळावर श्री रेणुकादेवीच्या गाभाऱ्यातील लाईव्ह दर्शन, नवरात्रौत्सवादरम्यान होणाऱ्या महाआरती, छबिना, कुमारिका पूजन अश्या विविध धार्मिक विधींचे दैनंदिन व्हिडीओ अपडेट्स (दैनंदिन दर्शन) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसची वाहतूक व्यवस्था व वेळापत्रक, माहूरगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगची माहिती व लाईव्ह मॅपद्वारे दिशादर्शन, आरोग्य सुविधांची माहिती व गुगल लोकेशन, आपत्कालीन सेवांची माहिती व दिशादर्शन, विविध आस्थापनांचा लाईव्ह मॅप आदी सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
नवरात्रौत्सवादरम्यान आयोजित नृत्य व संगीत कार्यक्रमांचे व्हिडीओ प्रक्षेपण, तसेच नऊ दिवस नऊ आरत्या व नऊ अष्टके यांचे दैनंदिन अपडेट्सही संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय भाविकांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली इतर महत्त्वाची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
“नवरात्रौत्सवाच्या काळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरगडावर येतात. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे तसेच माहूरगडावरील विविध सुविधा, वाहतूक, पार्किंग, आरोग्य व आपत्कालीन सेवांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संकेतस्थळ अधिक उपयुक्त स्वरूपात अद्ययावत करण्यात येत आहे,” अशी माहिती विश्वस्त समिती, श्री रेणुकादेवी संस्थान, माहूर यांच्यावतीने देण्यात आली.
या संकेतस्थळाची निर्मिती तसेच अद्ययावतीकरण सेटट्राईब या महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त आयटी कंपनीद्वारे सेवार्थ करण्यात येत आहे. ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सेटट्राईब कडून श्री रेणुकादेवी संस्थानच्या भाविकांसाठी डिजिटल माध्यमातून माहिती व सुविधा अधिक सुलभ करण्याचे काम करण्यात येत आहे.
भाविकांनी नवरात्रौत्सवादरम्यान आवश्यक माहिती व सुविधांसाठी shrirenukadevi.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन श्री रेणुकादेवी संस्थान, माहूर विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



