सेवानिवृत्त सपोनि मकाजी राठोड यांचा सपत्नीक सत्कार

 


उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, तहसीलदार अभिजित जगताप यांच्या हस्ते गौरव



सिंदखेड / माहूर : माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवा बजावणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मकाजी राठोड हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जोंधळे यांच्या पुढाकाराने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अभिजित जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जोंधळे यांच्या हस्ते मकाजी राठोड व त्यांच्या पत्नीला शाल, पुष्पगुच्छ, साडी-चोळी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सिंदखेड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सेवा बजावताना राठोड यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासह विविध सामाजिक व धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. नागरिकांशी सलोख्याचे संबंध जपत कर्तव्य बजावणारे अधिकारी म्हणून त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवाकार्याचे कौतुक करून सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सन्मानामुळे राठोड दाम्पत्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post