शेतकरी जितेंद्र पेटकुले यांच्या कुटुंबीयांचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी केले सांत्वन





कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदतीची ग्वाही


वाढोणा : येथील शेतकरी जितेंद्र वामन पेटकुले यांनी कर्जाच्या विवंचनेतून विहिरीत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ७ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. या घटनेची दखल घेत आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी मृत शेतकरी पेटकुले यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

यावेळी आमदार तोडसाम यांनी शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांच्या कष्टावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलावे लागणे ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी जगला पाहिजे, त्याचे कुटुंब सुरक्षित राहिले पाहिजे आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला शासन व प्रशासनाकडून योग्य मदत मिळाली पाहिजे, ही काळाची गरज असल्याचेही आमदार तोडसाम यांनी यावेळी सांगितले. या दुःखद प्रसंगी पेटकुले कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post