पारंपरिक सुतारकामातून उद्योजकतेची भरारी ; राजपाल वरघट यांचा राज्यस्तरीय गौरव...!

 


महाराष्ट्र उद्योग विकास केंद्राच्या वर्धापनदिन सोहळ्यात ‘उत्कृष्ट उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित ; बैलगाडी निर्मितीतून जपली ग्रामीण संस्कृतीची परंपरा


संपादक मिलींद जामनिक 


मूर्तिजापूर : तालुक्यातील रोहणा येथील राजपाल वरघट यांना महाराष्ट्र उद्योग विकास केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट उद्योजक’ या गौरवाने सन्मानित करण्यात आले. पारंपरिक सुतारकामाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वरघट यांच्या कार्याची या सन्मानाच्या निमित्ताने दखल घेण्यात आली आहे.

          सुतारकाम हा पारंपरिक व्यवसाय सांभाळताना राजपाल वरघट यांनी ग्रामीण जीवनाशी नाते जपणाऱ्या बैलगाडी निर्मितीच्या कलेलाही महत्त्व दिले आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक करण्यासाठी बैलगाडी हे महत्त्वाचे साधन होते. या पारंपरिक साधनाची निर्मिती करणाऱ्या वरघट यांनी अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना बैलगाड्या सप्रेम भेट देऊन या कलेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.आधुनिक युगात यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक व्यवसायांचे स्वरूप बदलत असताना सुतारकामासारख्या कौशल्याधारित व्यवसायातून उद्योजकीय ओळख निर्माण करणे ही उल्लेखनीय बाब आहे. वरघट यांना मिळालेल्या राज्यस्तरीय सन्मानामुळे रोहणा गावासह मूर्तिजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ग्रामीण भागातील पारंपरिक कौशल्य, मेहनत आणि व्यवसायातील सातत्य यांची दखल घेत मिळालेल्या या गौरवाबद्दल राजपाल वरघट यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post