चिखलदरा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर; नांदेड जिल्ह्यात काँग्रेस संघटन बळकट करण्याचा निर्धार
नांदेड : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे काँग्रेस पक्षातर्फे आयोजित ‘लोकशाही मूल्य संवर्धन अभियान’ अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातून डॉ. पुंडलिक आमले यांची निवड करण्यात आली आहे. लोकशाही मूल्यांचा प्रसार, काँग्रेस संघटनेची मजबुती तसेच युवा कार्यकर्त्यांची वैचारिक आणि संघटनात्मक क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पक्षाची विचारधारा, उद्दिष्टे आणि धोरणे जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची क्षमता असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी देण्यात आली. ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक विभागांतील विविध जिल्ह्यांमधील निवडक पदाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. यावेळी देशातील विविध भागांतून आलेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी व मार्गदर्शकांनी सहभागी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकशाही मूल्ये, संविधानिक विचार, जनतेशी संवाद साधण्याची प्रभावी पद्धत आणि पक्ष संघटन विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. युवा कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यपद्धतीची माहिती मिळावी आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
डॉ. पुंडलिक आमले यांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, राहुल गांधी यांच्या युवा कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या विचारानुसार काँग्रेसने राबविलेला हा उपक्रम स्वागतार्ह आहे. काम करण्याची क्षमता आणि जिद्द असलेल्या तरुणांना निवडून त्यांना योग्य मार्गदर्शन व जबाबदारी देण्याच्या या प्रक्रियेमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. प्रशिक्षणामुळे पक्षकार्याची दिशा स्पष्ट होण्यासोबतच नव्या आत्मविश्वासाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करून नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचा विस्तार करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ. आमले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अनुसूचित जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष साजिद खान पठाण यांचे आभार मानले.
नांदेडमध्ये संघटन बळकट करण्याचा निर्धार
नेतृत्वाने दाखविलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असल्याचे सांगत डॉ. पुंडलिक आमले यांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी करणार असल्याचे स्पष्ट केले. युवा कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, त्यांच्यात लोकशाही व संविधानिक मूल्यांविषयी जागृती निर्माण करणे आणि काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


