३ ते ४ वर्षे वयोगटातील वाघीण; शवविच्छेदनानंतर सावरी वन आगारात अंत्यसंस्कार
किनवट / ग्रामीण प्रतिनिधी
धिरज साळुंके सह प्रदीप कुमार सावते
किनवट : बोधडी वनपरिक्षेत्रातील दरसांगवी नियतक्षेत्रात किनवट ते नांदेड रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १७ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. सोमेश्वर महादेव मंदिर परिसरातील मदनापूरजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच नांदेडच्या उपवनसंरक्षक मनिषा पाटील यांच्यासह वनविभागातील वरिष्ठ अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (NTCA) प्रतिनिधी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी मृत वाघिणीची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला.
वनविभागाच्या प्राथमिक पाहणीत रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मृत वाघिणीचे वय अंदाजे तीन ते चार वर्षे असल्याची माहिती देण्यात आली. तसेच तिचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले.
सावरी वन आगारात शवविच्छेदन
मृत वाघिणीला पुढील कार्यवाहीसाठी सावरी वन आगारात नेण्यात आले. उपवनसंरक्षक मनिषा पाटील, सहाय्यक वनसंरक्षक एस.डी. इटलोड आणि NTCA प्रतिनिधी अतिंद्र कटी यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने वाघिणीचे शवविच्छेदन केले. या प्रक्रियेदरम्यान पुढील तपासणीसाठी विसेराचे नमुनेही घेण्यात आले.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत सावरी वन आगारात मृत वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने आवश्यक पंचनामा व नोंदणीची कार्यवाही केली.
वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी
या वेळी सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. पोतुलवार, धिरज मदने, वन्यजीव अधिकारी खरबी टी.एन. साळुंके, किनवट रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक भगवान नागरे तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
रेल्वेमार्गावर वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागांत अशा घटना घडल्याने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.


