क्यूआर स्कॅन करा अन् नंबरची चिठ्ठी मिळवा....!

 


उपजिल्हा रुग्णालयात रांगेचा त्रास टळणार : मोबाईलवरूनच मिळणार तपासणीचा नंबर


मिलींद जामनिक- संपादक 

मूर्तिजापूर : शहरासह तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेचा आधारवड ठरलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज सुमारे 600 ते 700  रुग्णांची तपासणी होत असल्याने डॉक्टरांकडे तपासणीचा नंबर मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत होते. आता या त्रासावर डिजिटल उपाययोजना करण्यात आली असून, क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईलवरच नंबरची चिठ्ठी मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

          सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित " ड्रिफकेस " अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करून रुग्णालयात उपलब्ध करून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे.क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर रुग्णाला तपासणीसाठीचा क्रमांक मिळणार असल्याने नंबरची चिठ्ठी घेण्यासाठी रुग्णालयात स्वतंत्र रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.

विशेषतः ग्रामीण भागातून पहाटेपासून रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा दिलासादायक ठरणार आहे. वयोवृद्ध, महिला, दिव्यांग तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना रांगेत बराच वेळ उभे राहण्याचा त्रास सहन करावा लागतो. डिजिटल पद्धतीने नंबर मिळाल्यामुळे रुग्णालयातील गर्दीचे व्यवस्थापन होण्यासह वेळेचीही बचत होण्याची अपेक्षा आहे.

---------------------------------------------------

रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी येतात. नंबरची चिठ्ठी घेण्यासाठी होणारी गर्दी व रांगेतील प्रतीक्षा कमी करण्याच्या उद्देशाने क्यूआर कोडच्या माध्यमातून नंबर घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी मोबाईलमध्ये संबंधित अॅप डाउनलोड करून या सुविधेचा अधिकाधिक वापर करावा. त्यामुळे रुग्णालयातील गर्दी कमी होऊन आरोग्यसेवा अधिक सुलभ व गतिमान होण्यास मदत होईल.

डॉ. राजेंद्र नेमाडे, वैद्यकीय अधिक्षक

श्रीमती ल.दे.उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापुर

---------------------------------------------------

गावाकडून रुग्णाला घेऊन रुग्णालयात आल्यानंतर नंबरची चिठ्ठी मिळविण्यासाठी पुन्हा रांगेत उभे राहावे लागत होते. त्यात वेळही जात होता आणि वयोवृद्ध रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मोबाईलवरूनच नंबर मिळत असेल तर ही सुविधा निश्चितच उपयुक्त ठरेल. मात्र ज्येष्ठ नागरिक व मोबाईलचा वापर न करणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी रुग्णालयात मार्गदर्शनाची व्यवस्था असावी.

सिद्धार्थ समदुरे, बोर्टा

Post a Comment

Previous Post Next Post