किनवट : आदिवासी लोकसंस्कृतीचा ठेवा जपणारे बुधवारपेठ येथील ज्येष्ठ ढेमसा वाद्यनिर्मितीकार भालेराव नागोराव दळांजे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘वाद्य निर्मिती राज्यस्तरीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.
बुधवारी (९ सप्टेंबर) गावातच झालेल्या विशेष समारंभात आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी बी. सरवनन यांच्या हस्ते दळांजे यांचा सन्मान करण्यात आला. तीन लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
आदिवासी समाजाच्या पारंपरिक नृत्य, सण-उत्सव आणि लोकविधींमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या ढेमसा वाद्यनिर्मितीची परंपरा दळांजे यांनी अनेक वर्षे जपली. आधुनिक वाद्यांच्या प्रभावामुळे पारंपरिक कला लोप पावत असताना त्यांच्या योगदानाची शासनाने दखल घेतली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबई येथे पुरस्कार स्वीकारता आला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकाराने प्रशासनाने हा राज्यस्तरीय सन्मान त्यांच्या गावातच प्रदान केला. यावेळी विविध मान्यवर, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढेमसाच्या तालाला आकार देणाऱ्या कलाकाराचा गावच्या मातीत झालेला हा सन्मान आदिवासी लोककलेच्या गौरवाचा ऐतिहासिक क्षण ठरला.


