एआयच्या मदतीने जुन्या आठवणींना उजाळा ; तरुणाईसह ज्येष्ठांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद,पोलीसांकडून सावधगिरीचे आवाहन
मिलींद जामनिक
मूर्तिजापूर : स्मार्टफोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या वाढत्या वापरामुळे समाजमाध्यमांवर नवनवीन ट्रेंड सातत्याने पाहायला मिळत आहेत. सध्या ८०च्या दशकातील छायाचित्रांसारखे आपले फोटो बनविण्याचा नवा ट्रेंड सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला असून, शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्येही त्याची मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
पूर्वीच्या काळातील कपडे, केशभूषा, सायकल, जुन्या काळातील घरांची पार्श्वभूमी, काळा-पांढरा किंवा जुन्या कॅमेऱ्याच्या छायाचित्रासारखा लूक देत एआयच्या माध्यमातून सध्याच्या छायाचित्राचे रूपांतर केले जात आहे. अनेक जण आपल्या बालपणीचा किंवा तरुणपणीचा फोटो असल्याचा भास निर्माण करणारे छायाचित्र तयार करून ते फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह विविध समाजमाध्यमांवर शेअर करीत आहेत.विशेष म्हणजे, प्रत्यक्षात ८०च्या दशकात जन्मलेल्या किंवा त्या काळातील आठवणी जपलेल्या नागरिकांनाही या ट्रेंडने भुरळ घातली आहे. जुन्या आठवणी, त्या काळातील वेशभूषा आणि जीवनशैली पुन्हा छायाचित्राच्या माध्यमातून अनुभवता येत असल्याने अनेकांकडून या ट्रेंडचे स्वागत केले जात आहे. तरुणाईकडूनही आई-वडील, आजी-आजोबा यांच्या जुन्या छायाचित्रांना एआयच्या माध्यमातून नवा लूक देण्याचे प्रयोग केले जात आहेत.मात्र, एआयच्या माध्यमातून फोटो तयार करताना नागरिकांनी गोपनीयता आणि सायबर सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. अनोळखी संकेतस्थळे किंवा अॅपवर वैयक्तिक छायाचित्रे, मोबाईल क्रमांक, ई-मेल, ओटीपी किंवा अन्य संवेदनशील माहिती देणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. आकर्षक फोटो तयार करण्याच्या नादात वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
---------------------------------------------------
“एआयच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो तयार करणे हा मनोरंजनाचा भाग आहे. मात्र, समाजमाध्यमांचा वापर करताना नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. आपले वैयक्तिक फोटो अथवा माहिती कोणत्याही अनोळखी अॅप किंवा संकेतस्थळावर अपलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासावी. फोटोचा गैरवापर किंवा सायबर फसवणुकीचा प्रकार आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
धर्मेंद्र जोशी, ठाणेदार
मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशन
