गुप्तधनासाठी देवस्थानच उकरले!

 


शिवलिंग-नंदीच्या जागी लिंबू ठेवून जेसीबीने खोदकाम; इस्लापूर पोलिसांत गुन्हा



 किनवट :  गुप्तधनाच्या अंधश्रद्धेतून आप्पारावपेठ येथील मंदाबोगडा परिसरातील शिवलिंग व नंदी असलेल्या श्रद्धास्थळावर जेसीबीने खोदकाम करून नासधूस केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोदकामाच्या ठिकाणी लिंबू ठेवण्यात आल्याचेही पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

दि. २७ ऑगस्टच्या रात्रीपासून २८ ऑगस्टच्या सकाळपर्यंत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोजा रेड्डी मल्ला रेड्डी नुतुल यांच्या तक्रारीवरून इस्लापूर पोलिसांनी गुन्हा रजि. नं. १२३/२०२६ दाखल केला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम, २०१३ च्या कलम ३(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

गुप्तधनाच्या हव्यासापोटी श्रद्धास्थळाची नासधूस केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post