यवतमाळ,घाटंजी : विदर्भाची सांस्कृतिक परंपरा असलेल्या तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नंदीबैल सजावट आणि आकर्षक वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पारवा जिल्हा परिषद कन्या शाळा येथे इयत्ता पहिलीत शिकणारी चिमुकली कु. सिया अमोल उदार हिने बाजी मारली आहे.
पारंपारिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवात चिमुकल्यांनी आपल्या नंदी बैलांना अतिशय उत्कृष्ट रितीने सजवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बाल गोपाळासाठी तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने घाटी घाटंजी येथे सुरेश कुडेगावे मित्र मंडळाकडून भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान मुलांनी बैलांना रंगीबेरंगी झुली, बाशिंग, घुंगरू आणि फुग्यांनी सजवले होते. तसेच अनेक मुलांनी पारंपारीक शेतकरी वेशभूषा करून स्पर्धेत सहभाग घेतला. यात पारवा येथून पालक अमोल उदार यांनी त्यांची चिमुकली सिया उदार हिला आणून सहभाग घेतला. त्यांच्या नंदीची सजावट आणि सादरीकरण सर्वोत्तम ठरल्याने तिला नगराध्यक्ष परेश कारिया, पांढरकवडा येथिल सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरले, नगरसेवक शुभम उदार यांचे हस्ते प्रथम क्रमांकाचा बहुमान, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या बहुमानाने पारवा जि.प. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मानकर यांचेसह गावातील नागरिकांनी तीचे कौतुक केले. या स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली तर सहभागी सर्व बालकांना प्रोत्साहनपर शालेय साहित्याची भेट देण्यात आले.

