घाटंजी : विविध मंडळांच्या अंदाज समितीने शुक्रवारी घाटंजी तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय कार्यालये, विकासकामे आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली. समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दौऱ्यामुळे तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा दिवसभर सतर्क दिसून आली.
समितीतील आमदारांसह विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून विभागनिहाय कामांची माहिती, विकासकामांची सद्यस्थिती तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या वाहनांची मोठी वर्दळ शहरात दिसून आली. कार्यालये, रस्ते बांधकाम तसेच आश्रमशाळांचीही पाहणी करण्यात आली. कामांमध्ये त्रुटी आढळल्यास त्याची दखल घेऊन आवश्यक कार्यवाहीच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या दौऱ्यामुळे घाटंजी तालुक्यातील विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या समस्या आणि विकासकामांबाबत प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे.
दौऱ्याच्या प्रसंगी समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अभिषेक ठोकर, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश वाघण, नगरसेवक विक्रम ठोकर, मनोज हमाद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

