पावसाची साथ अन् यांत्रिकीकरणाचा फटका; बैलजोड्यांची संख्या घटली
घाटंजी : घाटंजी तालुक्यात पारंपरिक पोळा सण यंदा पावसाच्या प्रदीर्घ सरी आणि शेतीतील वाढत्या यांत्रिकीकरणामुळे उत्साहाविना साजरा करण्यात आला. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या पोळ्याला यंदा ग्रामीण भागात अपेक्षित गर्दी आणि बैलजोड्यांची संख्या कमी दिसून आली.
पूर्वी पोळ्याच्या दिवशी गावातील रस्ते बैलजोड्यांनी गजबजून जात असत. मात्र, ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती यंत्रांचा वापर वाढल्याने बैलजोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच यंदा पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, बाजारपेठेतही मंदीचे वातावरण आहे.
पावसामुळे शेतीच्या कामांवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. कपाशी व सोयाबीन पिकांवरही पावसाचा परिणाम होत असून, उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पूर्वी पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जात असे. गावागावांत पारंपरिक पद्धतीने पोळा भरविला जात असे. मात्र यांत्रिकीकरणामुळे शेतीत बैलांचा वापर कमी झाल्याने ही परंपरा हळूहळू लोप पावत असल्याचे चित्र आहे.
महागलेला चारा, बैलांचा सांभाळ आणि वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांसाठी बैलजोडी सांभाळणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे. परिणामी पारवा, कुळी, सायफळ, जरा, मुरली, वासरी आदी गावांमध्येही यंदा पोळ्याचा उत्साह काहीसा कमी जाणवला.
“परंपरा जपण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे,” अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

