ठिबक सिंचन काळाची गरज; कृषी अधिकारी विनोद कदम यांचे प्रतिपादन

 


Maharashtra 






माहूर : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ठिबक सिंचनाचा वापर ही काळाची गरज असून, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे, असे प्रतिपादन कृषी अधिकारी विनोद कदम यांनी केले.


माहूर तालुक्यातील मौजे आसोली येथील प्रगतिशील शेतकरी तथा सरपंच चरणसिंग राठोड यांनी विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर ठिबक सिंचनाचा वापर करून पाच एकर क्षेत्रात कापूस पीक घेतले आहे. कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीतही ठिबक सिंचनामुळे त्यांच्या शेतातील कापूस चांगला बहरला असून, यावर्षी एकरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


कृषी अधिकारी विनोद कदम यांनी राठोड यांच्या शेताला वेळोवेळी भेट देऊन कापूस पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच पिकाचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या शेतातील कापूस पीक पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत आहेत.


माहूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कमी पावसामुळे ठिबक सिंचनाचा आधार घेतला असून, त्यांची पिके चांगली बहरलेली दिसून येत आहेत. तालुका कृषी अधिकारी वर्षा चव्हाण, कृषी अधिकारी विनोद कदम व कृषी सहाय्यक अजय सावळे यांनी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब करून पाण्याची बचत तसेच उत्पादनात वाढ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी विनोद कदम यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post