अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लेट लतीफशाहीमुळे नागरिक त्रस्त; गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त
घाटंजी :पंचायत समितीचा कारभार मागील काही दिवसांपासून ढेपाळल्याचे चित्र असून, कार्यालयीन वेळेत अनेक अधिकारी, कर्मचारी व लिपिक उपस्थित नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे विविध शासकीय कामांसाठी पंचायत समितीत येणाऱ्या शेतकरी, नागरिक, विद्यार्थी तसेच घरकुल, बांधकाम, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, उमेद व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नियमित गटविकास अधिकारी नसल्याने गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यवतमाळ येथील सहाय्यक गटविकास अधिकारी रिकी दाबरे यांच्याकडे घाटंजी पंचायत समितीचा तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे. मात्र, प्रभारी व्यवस्थेने अपेक्षित प्रशासकीय शिस्त निर्माण झालेली नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
घाटंजी तालुका हा पेसा व आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील **७१ ग्रामपंचायती व १२१ गावांचे** सनियंत्रण पंचायत समिती स्तरावर केले जाते. आरोग्य, बांधकाम, शिक्षण, महिला व बालविकास, कृषी, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन तसेच पंचायत विभागाशी संबंधित विविध योजनांसाठी नागरिकांना पंचायत समितीवर अवलंबून राहावे लागते.
बहुतांश अधिकारी-कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करीत असल्याने वेळेवर उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून दूरवरून शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी भेटत नसल्यास पुन्हा रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, सुमारे चार महिन्यांपूर्वी पंचायत समिती आवारात **१३ लाख रुपये खर्च करून आरओ फिल्टरची सुविधा** सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, अवघ्या **१५ दिवसांतच आरओ फिल्टर बंद** पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बंद पडलेली यंत्रणा अद्याप सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न झाले नसल्याचीही तक्रार आहे.
प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

