भालेराव कुटुंबाची १ लाख १० हजारांची रोख रक्कम, दागिने व संसारोपयोगी साहित्य जळून खाक
नेरपिंगळाई : नेरपिंगळाई येथील सावरकरपुरा, वॉर्ड क्रमांक १ मध्ये बंद घराला अचानक भीषण आग लागून अजाबराव भालेराव यांच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या दुर्घटनेत घरातील १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कपडेलत्ते, अन्नधान्य, भांडीकुंडी व संसारोपयोगी साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले.
घटनेच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नसल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे घरातील बहुतांश साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेमुळे भालेराव कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, त्यांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत नेरपिंगळाई तसेच तहसीलदार कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शासकीय पंचनामा करून नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, सौ. सोनालीताई ग. नवले (महिला जिल्हाध्यक्ष, YSP अमरावती तथा माजी उपसभापती, पंचायत समिती मोर्शी) यांनी घटनास्थळी भेट देऊन भालेराव कुटुंबाची भेट घेतली. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी कुटुंबाला तात्काळ ५ हजार रुपयांची रोख आर्थिक मदत दिली.
यावेळी पंचनामा करण्यासाठी नेरपिंगळाई भाग-१ चे तलाठी मनोहरे साहेब, भाग-२ च्या तलाठी जयश्री कडू, ग्रामपंचायत सचिव अरविंदजी आमले, माजी सरपंच विलासराव खाजबागे, सहकारी सोसायटी नेरपिंगळाईचे संचालक राहुलजी मंगळे, गावचे कोतवाल राजेशजी मोहोकर, बाळूभाऊ तव्वर यांच्यासह अजाबराव भालेराव, सौ. कौसल्याताई भालेराव, त्यांच्या दोन मुली, जावई तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
भालेराव कुटुंबाला शासनाकडून तातडीने योग्य आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

