महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन अकोला येथे उत्साहात संपन्न

Akola



पत्रकारांच्या सुरक्षा, सन्मान आणि हक्कांवर भर; ज्येष्ठ पत्रकार पी. एन. देशमुख यांचा विशेष गौरव


अकोला | प्रतिनिधी


"एकता • नीतिमत्ता • पत्रकारिता" या ब्रीदवाक्याखाली महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन अकोला येथे उत्साहात संपन्न झाले. राजराजेश्वर मंदिराच्या घड्याळ टॉवर परिसरात आयोजित या अधिवेशनाला राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेकडो पत्रकारांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.


अधिवेशनात पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा, मानधनवाढ, प्रेस कार्डचे नियम, डिजिटल पत्रकारितेची आव्हाने तसेच ग्रामीण व स्थानिक पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष डॉ. विश्वासराव आनंदराव आरोटे, दैनिक समर्थ गावकरीचे प्रबंध संपादक, दैनिक मतदारचे संपादक मोढे साहेब, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीणभाऊ सेगोकार, दैनिक देशोन्नतीचे अमरावती प्रतिनिधी इंगळे साहेब तसेच संघाचे पदाधिकारी व राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.


अधिवेशनात पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी, लहान व ग्रामीण वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातीत प्राधान्य, पत्रकार कल्याण निधीत वाढ तसेच ग्रामीण व शहरी पत्रकारांना कोणतीही अतिरिक्त अट न ठेवता शासनामार्फत अधिकृत ओळखपत्र देण्याबाबत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत शासनाचे लक्ष वेधून प्रभावी उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली.


पी. एन. देशमुख यांचा विशेष सन्मान


या अधिवेशनात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर तसेच इतर जिल्ह्यांतील ज्येष्ठ, युवा आणि महिला पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


पत्रकारितेतील दीर्घकालीन योगदान, निर्भीड व निष्पक्ष वृत्तांकन तसेच सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी सातत्याने आवाज उठवल्याबद्दल दैनिक कलमवीरचे ज्येष्ठ पत्रकार व अमरावती जिल्हा प्रतिनिधी श्री. पी. एन. देशमुख यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला.

त्यांच्या या सन्मानाबद्दल अमरावती जिल्ह्यातील पत्रकार बांधव तसेच दैनिक कलमवीर परिवाराने त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. शेवटी सर्व पत्रकारांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत अधिवेशनाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

Post a Comment

Previous Post Next Post