वानोळ्यात जळालेली कृषी डीपी दोन दिवसांत बसवली


हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रवी राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; मोबाईल टॉवरनंतर कृषी डीपीचा प्रश्नही मार्गी



माहूर : तालुक्यातील वानोळा बाजार येथील 100 केव्ही क्षमतेची कृषी वीज वितरण पेटी (डीपी) जळाल्याने बंद पडलेला कृषी पंपांचा वीजपुरवठा अखेर दोन दिवसांत पूर्ववत करण्यात आला. मा. ना. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख रवी राठोड यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे नवीन 100 केव्ही क्षमतेची डीपी बसविण्यात आली.

दि. 22 रोजी वानोळा बाजार येथील कृषी डीपीतील अंतर्गत वायरिंग जळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत माहूर उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर केला होता. दरम्यान, पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.

शेतकऱ्यांनी ही समस्या रवी राठोड यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रवी राठोड यांनी भोकर व नांदेड येथील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत नवीन 100 केव्ही क्षमतेची डीपी बसविण्यात आली आणि कृषी पंपांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला.

मोबाईल नेटवर्कचाही प्रश्न मार्गी

दरम्यान, वानोळा पंचक्रोशीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या मोबाईल नेटवर्कच्या समस्येबाबतही रवी राठोड यांनी दि. 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे निवेदन दिले होते. या पाठपुराव्यानंतर वानोळा येथे मोबाईल टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून, लवकरच 5G सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाईल टॉवरनंतर कृषी डीपीचा प्रश्नही मार्गी लागल्याने वानोळा परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून विकासकामांच्या पाठपुराव्याला वेग आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

डीपी बसविताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी सुरेश राठोड, संजय चव्हाण, ईश्वर चव्हाण, किशोर पाटील, प्रवीण चव्हाण, अजय चव्हाण, रोशन चव्हाण, राम चव्हाण, अविनाश चव्हाण यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. वीजपुरवठा पूर्ववत झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी मा. ना. हेमंत पाटील व रवी राठोड यांचे आभार मानले.

परिसरातील शेतकरी व नागरिकांना कोणतीही अडचण भेडसावल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन रवी राठोड यांनी केले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post