Right to Information | आरटीआय माहिती न दिल्याचा आरोप; लोकायुक्तांकडे तक्रार


विभागीय संपादक /निलेश रामगावकर‌ 

अमरावती : माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत मागितलेली माहिती विहित मुदतीत न मिळाल्याचा तसेच प्रथम अपिलीय सुनावणीदरम्यान माहिती देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याचा आरोप करीत देवेंद्र योगेंद्र भोंडे यांनी महाराष्ट्राचे लोकायुक्त/उपलोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

देवेंद्र भोंडे यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी 19 मे 2026 रोजी पशुवैद्यकीय दवाखाना, आमला विश्वेश्वर येथील जनमाहिती अधिकारी तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मुरकर यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियमांतर्गत अर्ज दाखल केला होता. मात्र, निर्धारित कालावधीत माहिती प्राप्त न झाल्याने त्यांनी 1 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद अमरावतीच्या संबंधित प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केले.

या प्रथम अपिलाच्या अनुषंगाने 29 जुलै 2026 रोजी सुनावणी झाली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सुनावणीदरम्यान जनमाहिती अधिकारी डॉ. अमोल मुरकर यांनी प्रथम अपिलीय अधिकारी डॉ. वल्लभ जोशी यांच्या समक्ष मागितलेली माहिती आठ दिवसांत देण्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही माहिती मिळाली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर भोंडे यांनी 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी व कार्यवाहीची मागणी केली. मात्र, या तक्रारीवरही अद्याप ठोस निर्णय, चौकशी अहवाल अथवा कार्यवाही अहवाल मिळालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र भोंडे यांनी लोकायुक्तांकडे तक्रार करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच माहिती अधिकार अर्जावर वेळेत कार्यवाही न होण्याची कारणे तपासणे, प्रथम अपिलीय सुनावणीदरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता का झाली नाही याची चौकशी करणे, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि दोष आढळल्यास नियमानुसार प्रशासकीय अथवा शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, 19 मे 2026 रोजीच्या माहिती अधिकार अर्जातील मागितलेली माहिती उपलब्ध करून देणे, 31 ऑगस्ट रोजीच्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल देणे आणि संबंधित कार्यालयीन नोंदी, पत्रव्यवहार व प्रथम अपिलीय सुनावणीचा रोजनामा तपासण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post