किनवट शाखेत ग्राहकांची गैरसोय; चौकशी व कारवाईची मागणी
पंडित धुप्पे | जिल्हा विशेष प्रतिनिधी
किनवट : शासनाच्या निर्देशानुसार रविवारी बँकिंग सेवा सुरू ठेवण्यात आल्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या किनवट शाखेत विविध कामांसाठी ग्राहक दाखल झाले. मात्र, शाखेत आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने अनेक ग्राहकांना बँकिंग व्यवहार न करताच परतावे लागल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
रविवारी बँक सुरू असल्याचे पाहून पैसे काढणे, भरणे, रक्कम हस्तांतरित करणे तसेच इतर बँकिंग व्यवहारांसाठी ग्राहक शाखेत आले होते. मात्र, शाखेत केवळ काही कर्मचारी उपस्थित असून साफसफाई व परिसराची व्यवस्था केली जात असल्याचे दिसून आले. संबंधित कामकाजासाठी आवश्यक अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ग्राहकांची कामे झाली नसल्याचे सांगण्यात आले.
“ग्राहकांना सेवा द्यायची नसेल तर बँक सुरू कशासाठी ठेवण्यात आली?” असा सवाल काही ग्राहकांनी उपस्थित केला. रविवारी बँकिंग सेवा उपलब्ध होईल, या अपेक्षेने आलेल्या ग्राहकांचा वेळ वाया गेल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शाखेतील व्यवस्थापनाच्या ग्राहकांशी वर्तणुकीबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. एका ग्राहकाला कथितरीत्या ‘गेट आऊट’ असे बोलून अपमानित केल्याची बाबही चर्चेत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत झालेली नाही.
या संपूर्ण प्रकाराची क्षेत्रीय व विभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून रविवारी नियोजित बँकिंग सेवा प्रत्यक्षात का देण्यात आली नाही, याची कारणमीमांसा करावी. तसेच दोष आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ‘आमची बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक’ हे ब्रीदवाक्य असून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा देताना त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली.
