माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लखमापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविल्याप्रकरणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांच्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर 2026 रोजी लखमापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत परवानाधारक दोन आणि विनापरवाना तीन, अशा एकूण पाच गणेश मंडळांचा सहभाग होता.
यापैकी काही मंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या आवाजात वापर केल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विसर्जन मिरवणूक वेळेत न संपवल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलिसांनी चार आयचर वाहनांसह डॉल्बी सिस्टीम जप्त केली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1 कोटी 37 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये—
- MH 12 MV 2631 – वाहन व डॉल्बी सिस्टीम, अंदाजे 32 लाख रुपये
- MH 04 HD 4841 – वाहन व डॉल्बी सिस्टीम, अंदाजे 34 लाख रुपये
- MH 04 EY 5147 – वाहन व डॉल्बी सिस्टीम, अंदाजे 35 लाख रुपये
- MH 14 LX 2572 – वाहन व डॉल्बी सिस्टीम, अंदाजे 36 लाख रुपये
असा एकूण 1 कोटी 37 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, MH 04 EL 5875 क्रमांकाच्या टेम्पोसह डॉल्बी सिस्टीम मिरवणुकीतून निघून गेल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी लखमापूर बीटचे पोलीस हवालदार संदीप पुंडलिकराव गोपनवाड यांच्या फिर्यादीवरून माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे आणि पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके व पोलीस कर्मचारी करीत आहेत.
या कारवाईमुळे लखमापूर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

