शैक्षणिक गुणवत्ता, तंत्रज्ञानाधारित शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केले कौतुक
विभागीय संपादक निलेश रामगावकर
अमरावती/धामणगाव रेल्वे
धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलला अमरावती बोर्डाचे अध्यक्ष संदीप सांगवी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, विविध उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. भेटीदरम्यान संदीप सांगवी यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत तसेच शाळेतील विविध उपक्रमांविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. यासोबतच शिक्षकांशी संवाद साधून शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांचा आढावा घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता, शिस्त, जबाबदारीची भावना आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी शाळेतील विविध विभागांची पाहणी केली. तसेच COGNO या तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक उपक्रमाची माहिती घेतली. अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या विचारशक्ती, सर्जनशीलता आणि विविध कौशल्यांना चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या शैक्षणिक परिस्थितीचा विचार करता शिक्षकांचे सातत्याने प्रशिक्षण व कौशल्यविकास होणे गरजेचे असून, आधुनिक शिक्षणपद्धती आत्मसात करून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी शाळा संचालक राजेंद्र जोशी, से.फ.ला. हायस्कूलचे प्राचार्य प्रशांत शेंडे, विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलचे प्राचार्य अमित वानखेडे व उपप्राचार्या रंजुश्री शेंडे उपस्थित होते. अध्यक्ष संदीप सांगवी यांची ही सदिच्छा भेट शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेच्या आगामी शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्राचार्य अमित वानखेडे यांनी अध्यक्ष संदीप सांगवी यांचे मार्गदर्शन व सदिच्छा भेटीसाठी आभार व्यक्त केले.

