शेंदूरजना खुर्द–कामनापूर घुसळी- काशीखेड-धामणगाव रेल्वे मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

 


विभागीय संपादक| निलेश रामगावकर 

Mo-  88065 81053

अमरावती/धामणगाव रेल्वे : शेंदूरजना खुर्द, कामनापूर घुसळी, काशिखेड परिसरातील नागरिकांना धामणगाव रेल्वेशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती अथवा नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात समीर नंदुजी ढोके व इतर गावकरी मंडळी तसेच भगवान नारायणराव कडपे, रा. कामनापूर (घुसळी), ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती यांनी उपविभागीय अभियंता, उपविभागीय कार्यालय, चांदूर रेल्वे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शेंदूरजना खुर्द ते धामणगाव रेल्वे हा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.

या मार्गाचा वापर शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कामानिमित्त धामणगाव रेल्वे येथे जाणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. धामणगाव रेल्वे हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय व इतर कामांसाठी नागरिकांना या मार्गावरून नियमित प्रवास करावा लागतो. मात्र रस्त्याची खराब अवस्था असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाला यापूर्वीही माहिती देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र अद्याप रस्त्याची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यात आलेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची तातडीने दुरुस्ती अथवा नूतनीकरण करावे. अन्यथा सर्व गावकऱ्यांच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post