केस मागे घेण्यासाठी दबावाचा आरोप; पत्रकार कांबळे व साक्षीदारांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न?

 

Journalist association, mahurnews Maharashtra

मूळ हल्ला प्रकरणातही संबंधित महिलेच्या सहभागाचा दावा; माहूर पोलिसांकडे पत्रकार समाधान कांबळे यांचा अर्ज




Nanded,माहूर :  शेकापूर येथील ग्रामसभा प्रकरणात दाखल असलेला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून, पत्रकार समाधान अशोक कांबळे, त्यांच्या कुटुंबीयांसह प्रकरणातील साक्षीदारांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात पत्रकार समाधान कांबळे यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी माहूर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन चौकशी व आवश्यक कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

कांबळे यांच्या अर्जानुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी शेकापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील विविध विकासकामांसाठी प्राप्त निधी, करण्यात आलेली कामे आणि जमाखर्चाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी सुनील नामदेवराव बेहेरे, रामेश्वर रेणुकादास चव्हाण, गणेश नामदेव राठोड व विवेक गणेश राठोड यांनी वाद घालून मारहाण केल्याचा त्यांचा आरोप आहे. या घटनेत डोक्याला दुखापत झाल्याबरोबरच धमकी व जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी कांबळे यांच्या फिर्यादीनुसार संबंधितांविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे अर्जात नमूद आहे.

गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी गणेश नामदेव राठोड यांची पत्नी सिंधू गणेश राठोड तसेच नामदेव पुनाजी राठोड हे गुन्हा मागे घेण्यासाठी स्वतःवर, कुटुंबीयांवर आणि प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.


कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, सिंधू गणेश राठोड यांच्या मूळ हल्ला प्रकरणातील सहभागाबाबतही त्यांनी यापूर्वी पोलिसांकडे माहिती दिली आहे. त्यामुळे संबंधितांकडून आपल्याविरुद्ध अथवा कुटुंबीयांविरुद्ध खोट्या तक्रारी किंवा कारवाई केली जाण्याची भीती त्यांनी अर्जातून व्यक्त केली आहे.


दुकानाला आग लागल्यानंतर खोटी तक्रार करण्याचा प्रयत्न ?

२० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सिंधू गणेश राठोड यांच्या किराणा दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेचा आधार घेऊन पत्रकार समाधान कांबळे, त्यांचे कुटुंबीय तसेच प्रकरणातील साक्षीदारांविरुद्ध दुकान जाळल्याची खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अर्जातून करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे आपल्यावर व कुटुंबीयांवर मानसिक दबाव निर्माण केला जात असून, मूळ प्रकरण मागे घेण्यासाठी खोट्या तक्रारींचा वापर केला जात असल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे.


जीवितास धोका असल्याची भीती

आपल्यासह कुटुंबीय, प्रकरणातील साक्षीदार आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध खोट्या कारवाया होण्याची शक्यता असून, आपल्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती कांबळे यांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सिंधू गणेश राठोड व नामदेव पुनाजी राठोड यांच्या भूमिकेची तपासणी करावी, खोट्या तक्रारींच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार कारवाई करावी, तसेच स्वतःसह कुटुंबीय व साक्षीदारांना आवश्यक संरक्षण द्यावे, अशी मागणी पत्रकार समाधान कांबळे यांनी माहूर पोलिसांकडे केली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post