वेळेवर उपचार मिळाल्याने संभाव्य धोका टळला; अमरावतीच्या इरविन रुग्णालयात उपचार सुरू
तळेगाव ठाकूर, दि. २३ सप्टेंबर २०२६ : तळेगाव ठाकूर येथे पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या महिलेला सर्पदंश झाल्याची घटना घडली. कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने वेळेवर उपचार मिळाले आणि संभाव्य धोका टळला.
प्राप्त माहितीनुसार, सौ. मनीषा सतीश बनकर (वय ३७) या पहाटे सुमारे ४ वाजता घरात झोपलेल्या असताना त्यांच्या खांद्याला काहीतरी रुतल्यासारखे जाणवले. त्यामुळे त्यांना जाग आली. सर्पदंशाचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ पती सतीश बनकर यांच्याशी संपर्क साधला.
त्यावेळी सतीश बनकर हे गावातील गणपती मंडळाजवळ महादेवाचे गाणे म्हणण्यासाठी गेले होते. घटनेची माहिती मिळताच ते मंडळातील कार्यकर्त्यांसह तातडीने घरी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मनीषा बनकर यांना विलंब न करता तिवसा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तिवसा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अमरावती येथील इरविन रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सर्पदंशाच्या घटनेनंतर तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. कुटुंबीयांनी वेळीच रुग्णालयात नेल्यामुळे संभाव्य धोका टळल्याचे सांगण्यात येत आहे.
