वानोळा येथे मोबाईल टॉवर उभारणीला सुरुवात

 

Mobile network problem


रवि राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; लवकरच 4G/5G नेटवर्क सेवा उपलब्ध होणार


वानोळा | प्रतिनिधी


माहूर व किनवट तालुक्याच्या अतिदुर्गम पेसा क्षेत्रातील वानोळा गावात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. वानोळा येथे मोबाईल टॉवर उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, सध्या पाया व बांधकामाचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच नागरिकांना 4G/5G सह आधुनिक मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.


नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, शेतकऱ्यांना बाजारभाव व पीकविमा संबंधित माहिती, ई-केवायसी, बँकिंग व्यवहार तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.


या गंभीर समस्येबाबत शिवसेना नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख रवि उत्तमराव राठोड यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी, नांदेड यांना निवेदन देऊन वानोळा येथे तातडीने मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी केली होती. या मागणीला विविध वृत्तपत्रे व वेब पोर्टल्सनी प्रसिद्धी देत प्रश्नाला वाचा फोडली.


माध्यमांच्या प्रसिद्धीसह प्रशासनाकडे करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर टॉवर उभारणीचे काम सुरू झाल्याने वानोळा व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


यावेळी रवि राठोड यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेत टॉवरच्या कामाला सुरुवात केल्याबद्दल जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाचे आणि या प्रश्नाला प्रसिद्धी देणाऱ्या सर्व वृत्तपत्रे, वेब पोर्टल्स व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post