यवतमाळ |
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज, 20 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता यवतमाळ शहरातील संविधान चौक (बसस्टँड) येथे शांततापूर्ण धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंदोलन कृती समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवाहनानुसार, विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपोषणावर असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे समितीने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर यवतमाळमधील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटनांनी एकत्र येत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, विद्यार्थी, युवक, नागरिक तसेच सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाही मार्गाने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आंदोलन कृती समितीने केले आहे.

