दारू काढताना किंवा विक्री करताना आढळल्यास थेट फोन करा : पोलीस निरीक्षक देविदास चोपडे
वानोळा, ता. माहूर : माहूर तालुक्यातील वानोळा गावात दारूबंदी करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीला महिला, पुरुष आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावात दारूबंदी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे म्हणाले, “गावातील महिला, पुरुष आणि युवकांचे असेच सहकार्य राहिले तर दारू काढणे किंवा दारू विक्री करण्याची हिंमत करणे सोपे नाही. तरीही कोणी दारू काढताना किंवा विक्री करताना आढळल्यास मला थेट फोन करा. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव, वानोळा बिट जमादार खंदाडे, सरपंच सुनीता सिडाम, उपसरपंच अभिजीत राठोड, माजी सरपंच माधव शेळके, ग्रामपंचायत सदस्य भीमराव कुडमेते, सुदाम चव्हाण, सुभाष आमटे, वसंत घाटोळकर, पत्रकार पंडित धुप्पे, मारुती सिडाम, किशोर पवार, सोनू तोडसाम यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.


