उपविभागीय अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट; उर्वरित पाच जणांची नावे गुन्ह्यात समाविष्ट करण्याची मागणी
विभागीय संपादक| निलेश रामगावकर
अचलपूर : कवठा बु. ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार निवारण शिबिरादरम्यान महिलेला मारहाण, जातीवाचक व अपमानास्पद शिवीगाळ तसेच अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील उर्वरित पाच जणांची नावे गुन्ह्यात समाविष्ट करून निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी पीडित महिलेने अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण सोमवारी सातव्या दिवशीही सुरूच होते.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन महिलेची बाजू जाणून घेतली. संबंधित प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
२८ जुलै २०२६ रोजीची घटना
२८ जुलै २०२६ रोजी कवठा बु. ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही व्यक्तींनी आपल्यावर हल्ला करून मारहाण केली, जातीवाचक व अपमानास्पद शिवीगाळ केली तसेच अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. घटनेच्या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सुमारे ४० ते ५० ग्रामस्थ उपस्थित असल्याचेही महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेप्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. मात्र, तक्रारीत स्पष्टपणे नमूद केलेल्या आणखी पाच व्यक्तींची नावे गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली नसल्याचा आक्षेप महिलेने घेतला आहे. त्यामुळे संबंधित पाच जणांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांची नावे गुन्ह्यात समाविष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सात दिवसांपासून उपोषण
याच मागणीसाठी महिलेने एसडीओ कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सात दिवस उलटूनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन महिलेची सविस्तर बाजू ऐकून घेतल्याने आता प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
किशोर मोहोड यांचीही भेट
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष किशोर मोहोड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पीडित महिलेची माहिती जाणून घेतली. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा तसेच तक्रारीत नमूद असलेल्या पाच जणांच्या भूमिकेची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, महिलेने केलेल्या आरोपांची सत्यता, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि त्यांची कायदेशीर जबाबदारी ही पोलिस तपासातूनच निश्चित होणार आहे. तक्रारदार महिलेने याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडेही निवेदन दिल्याचे सांगितले आहे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

