माहिती अधिकार अर्ज वर्ग करूनही माहिती नाही; आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
किनवट : आरोग्य उपकेंद्र मोहपूर येथे १९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसूतीच्या वेळी कर्मचारी अनुपस्थित असल्याच्या तक्रारीसंदर्भात माहिती अधिकारांतर्गत मागविलेली माहिती अद्याप अर्जदाराला मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.
मुख्य संपादक ‘गावाकडची बातमी’ देवेंद्र योगेंद्र भोंडे यांनी २८ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. या अर्जात प्रसूतीच्या वेळी कर्मचारी उपस्थित होते की नाही, तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती करण्यास नकार दिल्याच्या कथित प्रकाराबाबत कागदपत्रांसह माहिती मागविण्यात आली होती.
या अर्जाची माहिती तालुका आरोग्य अधिकारी, किनवट यांनी जनमाहिती अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र राजगड यांच्याकडे वर्ग केली. अर्जातील मुद्दे १ ते ६ नुसार नियमानुसार मुदतीत माहिती देऊन त्याबाबतचा अहवाल तालुका आरोग्य कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही पत्राद्वारे देण्यात आले होते.
मात्र, अर्ज वर्ग करूनही आजपर्यंत माहिती प्राप्त झालेली नसल्याने माहिती अधिकार कायद्याच्या कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित विभागाने विलंबाचे कारण स्पष्ट करून मागितलेली माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अर्जदाराकडून करण्यात येत आहे.

