माहूरमधील रखडलेली राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

 

गाव सहेली गावाकडची बातमी


माहूर : श्रीक्षेत्र माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१अ वरील विविध विकासकामे गेल्या पाच वर्षांपासून रखडल्याचा आरोप करत ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राज ठाकूर व अपिल बेलखोडे यांनी २८ सप्टेंबरपासून दत्त चौक (टी-पॉईंट) येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काही काम पूर्ण झाले असले, तरी अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. न्यायालय ते ग्रामीण रुग्णालय मार्गावरील पथदिवे बंद असल्याने नागरिक व भाविकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तसेच दत्त चौक ते ग्रामीण रुग्णालय मार्गावरील पेव्हर ब्लॉकचे काम, महामार्गाच्या दुभाजकाचे सुशोभीकरण व संरक्षक जाळीचे कामही प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पैनगंगा नदीवरील धनोडा–माहूर नवीन पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने नागरिकांना जुन्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. जुन्या पुलावर मोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

माहूर हे श्री रेणुकामाता मंदिर, भगवान दत्तात्रेयांचे जन्मस्थान यासह विविध धार्मिक व पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध असून नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी राज ठाकूर व अपिल बेलखोडे यांनी केली आहे. प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post