यवतमाळ | प्रतिनिधी
दिल्ली येथील जंतर-मंतरवर शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, नीट व इतर परीक्षा पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांना न्याय तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यवतमाळमध्ये पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी ज्येष्ठ वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून बळजबरीने हटविण्यात आल्याचा निषेध नोंदवला. तसेच आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर झाल्याचा आरोप करत संबंधित पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी अभिजीत दिपके यांच्यावरील शाईफेक प्रकरणाचाही निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात सोनम वांगचुक यांच्याशी संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शहरातील विविध सामाजिक, विद्यार्थी व नागरिक प्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

