जनगणना 2027 पूर्वतयारीला वेग ; मूर्तिजापूरात क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

 


गाव व शहर निर्देशिका माहिती संकलनासाठी 63 अधिकाऱ्यांना मार्गदर्शन ; 16 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरदरम्यान डेटा संकलन मोहीम



मूर्तिजापूर : जनगणना 2027 च्या अनुषंगाने गाव व शहर निर्देशिकेसाठी माहिती संकलनाची प्रक्रिया 16 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून, त्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण सोमवारी (दि. 20) पंचायत समिती, मूर्तिजापूर येथे पार पडले.

चार्ज अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणास जनगणना संचालनालय, मुंबईच्या सहायक संचालक  तेजल कटारे प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी अपर तहसीलदार कु. गिरीजादेवी लोखंडे, नायब तहसीलदार (महसूल) दिनेश सोनोने यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, नगरपरिषद क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 63 क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान सहायक संचालक  तेजल कटारे यांनी गाव व शहर निर्देशिकेसाठी आवश्यक माहिती संकलनाची सविस्तर कार्यपद्धती स्पष्ट केली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी माहिती संकलन करताना अचूकता, वस्तुनिष्ठता आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा व स्वच्छता, दळणवळण, वाहतूक व्यवस्था, संपर्क माध्यमे, बँका व पतसंस्था, वीज व इतर इंधन सुविधा, प्रमुख कृषी उत्पादने, हस्तकला तसेच शहरांतील नागरी व इतर पायाभूत सुविधांबाबतची माहिती संकलित करण्याच्या पद्धतीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

जनगणनेच्या विविध टप्प्यांतील माहिती संकलन पूर्ण झाल्यानंतर त्याचा समावेश जिल्हा जनगणना पुस्तिकेत करण्यात येणार असून, भविष्यातील विकास आराखडे व शासकीय नियोजनासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post