किनवट | प्रतिनिधी
दिल्ली येथील जंतर-मंतरवर देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य, पेपरफुटी रोखणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि हक्काच्या रोजगाराच्या मागण्यांसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचूक, अभिजित दीपके, आयशी घोष, आदर्श, नेहा, मनीष, अमीन व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थी-युवक कृती समिती आणि भारताचा लोकशाही फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २० जुलै रोजी किनवट येथे भव्य सद्भावना रॅली काढण्यात आली.
ठाकरे चौक ते जिजामाता चौक या मार्गावर निघालेल्या रॅलीत विद्यार्थी, युवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, वसतिगृहातील विद्यार्थी तसेच विविध क्लासेसचे संचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान "सर्वांना शिक्षण, सर्वांना काम मिळालेच पाहिजे", "संघर्ष जरी आहे, उम्मीद जिंदा आहे", "सोनम वांगचूक, हम आपके साथ हैं", "पेपरफुटी थांबवा", "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या", तसेच "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
या रॅलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मूर्ती साहेब, कॉम्रेड अर्जुन आडे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे, कॉम्रेड आडेलू बोनगीर, नगरसेवक प्रशांत कोरडे, काँग्रेस नेते सुभाष नाईक, आदिवासी नेते जयवंत वानोळे, शेषराव कोवे,अजय कोवे, जितेंद्र कुलसुंगे,
यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा व्यक्त करत, पेपरफुटीमुक्त परीक्षा व्यवस्था, सर्वांसाठी समान शिक्षणाच्या संधी आणि पात्र युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.
रॅलीचा समारोप जिजामाता चौक येथे करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज बुलंद करत देशाच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

