साईनाथ महाराजांच्या समाजसेवेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक

 


साईनाथ महाराजांच्या समाजसेवेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक

लोककल्याणकारी समाजसेवेची नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता




श्रीक्षेत्र माहूर : श्री आनंद दत्तधाम आश्रम, माहूरगडचे महंत राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन केले.

महाराष्ट्र शासनाकडून आयटीआय मार्गदर्शक स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर साईनाथ महाराजांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्यांनी स्वच्छता अभियान, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, "पाणी जिरवा-पाणी वाचवा", प्रदूषण नियंत्रण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्मचिंतन, रक्तदान शिबिरे तसेच आध्यात्मिक जनजागृती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. या उपक्रमांचा प्रगती अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

या प्रसंगी संभाजीनगरचे उद्योजक सुरेश जगाडे, दत्तकृपा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद देवडे, रामभाऊ ठोंबरे, विशाल डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

धोंड्याच्या महिन्यात साईनाथ महाराजांनी संपूर्ण महिना श्री आनंद दत्तधाम आश्रम, माहूर येथे वास्तव्यास राहून तालुक्यासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांसाठी अन्नदान व महापंगतीचे आयोजन केले. या उपक्रमाचे भाविकांनी विशेष कौतुक केले.

साईनाथ महाराज स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणावर विशेष भर देत असल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत भविष्यात आणखी मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून माहूरगडाच्या नावलौकिकातही भर पडणार असल्याचे मानले जात आहे.

राज्याचे आयटीआय स्वच्छता दूत व ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्तीनंतर साईनाथ महाराजांनी राज्यभरातील विविध आयटीआयमध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि मार्गदर्शनाचे कार्यक्रम राबविले. तसेच शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि विविध समाजोपयोगी उपक्रम त्यांच्या भक्तमंडळामार्फत सातत्याने सुरू आहेत.

या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडून लोककल्याणकारी समाजसेवेशी संबंधित आणखी मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाऊ शकते, अशी अपेक्षा भक्तमंडळी व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post