किनवट | प्रतिनिधी
किनवट–माहूर मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी आणि सिंदगी या चार मंडळांमध्ये अद्यापही पीक विमा रकमेचे वितरण सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकारी, किनवट यांना निवेदन देत चार दिवसांत पीक विमा वाटप सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नांदेड जिल्ह्यातील इतर अनेक भागांत पीक विम्याचे वितरण सुरू झाले असताना किनवट–माहूर मतदारसंघातील अनेक शेतकरी अद्यापही विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे अत्यावश्यक असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित विमा रक्कम वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनेने प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, चार दिवसांत पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू न झाल्यास १४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, किनवट येथे 'ढोल बजाओ' आंदोलन करण्यात येईल. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
याशिवाय शेतीसाठी नियमित वीजपुरवठा, सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भागीदारी तत्त्वावरील विहीर योजना राबविणे तसेच पानंद रस्ता योजनेच्या समित्यांवर शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना स्थान देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन रमेश कदम पाटील (जिल्हाध्यक्ष, नांदेड), भारत व्यंकटराव राठोड (इस्लापूर सर्कल प्रमुख), माधवराव पाटील हराळे (तालुकाध्यक्ष, किनवट), गुलाबराव पाटील हराळे आणि कृष्णा गंगाधर भिसे यांनी दिले आहे.

