खाकी वर्दीला मोठा धक्का; कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप

 

न्यायालय वाशिम,कोर्ट

जिल्हा प्रतिनिधी कैलास बनसोड 

वाशिम, दि. 3 जुलै: वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने 2011 मधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन पोलीस निरीक्षकासह 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला.

माहितीनुसार, 9 मे 2011 रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे आणि अन्य आठ पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकली होती. त्यावेळी बेग्या पवार याला चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले.


तपासादरम्यान गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी त्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बेग्या पवार यांचा 10 मे 2011 रोजी मृत्यू झाला.


या घटनेनंतर गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. सीआयडीने 34 दिवसांत तपास पूर्ण करून संबंधित पोलिसांविरुद्ध खुनाचा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला होता.


तब्बल 15 वर्षे 1 महिना 23 दिवसांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह पोलीस कर्मचारी मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दरम्यान, बेग्या पवार यांच्या आईने न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सांगितले की, बेग्या पवार यांच्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. केवळ पारधी समाजातील असल्यामुळे त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या निकालाकडे कोठडीतील मृत्यू आणि पोलीस जबाबदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post