मुंबई | प्रतिनिधी
राज्य शासनाने महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ हे मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम २७(२) अन्वये राज्य शासनाने दिनांक १२ जून २०२६ रोजी शासन राजपत्रात महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ प्रसिद्ध केले होते. मात्र, मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार या नियमांची अंमलबजावणी सध्या स्थगित करण्यात आली आहे.
यासंदर्भात सर्व महसुली विभागांच्या अधीनस्थ शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक प्राधिकरणांना ही बाब तात्काळ निदर्शनास आणून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ ची अंमलबजावणी न करण्याच्या सूचना संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे माहितीचा अधिकार कार्यकर्ते, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे लक्ष वेधले गेले असून, शासन पुढे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

